मास्टर स्ट्रोक शिवसेनेचा की मुख्यमंत्र्यांचा? “त्या”  6 नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात वेगळीच कुजबूज !

मास्टर स्ट्रोक शिवसेनेचा की मुख्यमंत्र्यांचा? “त्या”  6 नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात वेगळीच कुजबूज !

मुंबई – मुंबईमध्ये परवा अत्यंत नाट्यमयरित्या राजकीय घडामोडी घडल्या. मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत सामिल झाले. त्यानंतर राजकीय चिखलफेक सुरू झाली. यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद होणं स्वाभाविक आहे. कारण एकाचे नगरसेवक दुस-या पक्षात गेले. दोघे भाऊ एकमेकांवर तुटून पडले. कोट्यवधी रुपये मोजून शिवसेनेनं नगरसेवक खरेदी केले आणि शिवसेनेनं नीच राजकारण केल्याची टीका राज यांनी केली. तर मराठी महापौरांचे हात बळकट करण्यासाठी हे नगरसेवक शिवेसनेत आल्याचं उत्तर शिवेसेनेनं दिलं.

या वादामध्ये उडी मारली ती मुंबई भाजपातील नेत्यांनी. शिवसेनेचे नेते मनसेच्या  त्या 6 नगरसेवकांना घेऊन कोकण भवनात जात असतानाच त्यांची नाकेबंदी करण्यासाठी भाजपच्या या नेत्यांनी हरएक प्रयत्न केले. कोकण भवानातील संबधित अधिका-यांना तातडीने मंत्रालयात बोलावले. किरीट सोमय्या यांनी तर मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारातील पैसा या नगरसेवकांना खरेदी करण्यासाठी दिला गेल्याचा आरोप केला. तसंच एसीबी आणि निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार असल्याचंही सांगितलं. आशिष शेलार यांनाही उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. मुंबई महापालिकेती पोटनिवडणुक विजय मिळवल्यानंतरही या दोन्ही नेत्यांनी शिवेसनेला टार्गेट करत पुढील काळात मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचे संकेत दिले होते.

गेल्या महापालिका निवडणुकीपासून शेलार आणि किरीट सोमय्या हे दोन्ही नेते शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मुख्यंत्र्यांनी मात्र राजकीय प्रचारसभा सोडून शिवसेनेला फारसं दुखावलेलं नाही.  काही दिवसांपूर्वी हे 6 नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र त्यांना फोडून भाजपात घेण्यास मुख्यमंत्री फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळेच त्यांनी त्यांना लगेच प्रवेश दिला नाही अशीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही दुखवायचे नव्हते त्यामुळेच त्यांनी त्या 6 नगरसेवकांबाबत तातडीने कोणताही निर्णय केला नाही. मुख्यमंत्री बरोबर परदेश दौ-यावर गेले आणि शिवसेनेने संधी साधत त्या नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचले.

मुख्यमंत्र्यांनी ही खेळी करुन एका दगडात अनेक पक्षी मारले अशीही कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे. ते 6 नगरसेवक खेचण्यात सोमय्या आणि शेलार यांना अपयश आल्यामुळे त्यांचं महत्व आपोआप कमी झालं. शिवाय त्या दोन नेत्यांना उतावीळपणा कमी करुन शांत राहण्याचा सूचक इशारा दिला अशीही चर्चा आहे. त्याचबरोबर राज आणि उद्धव यांनाही दुखावले नाही. तसेच शिवसेना आणि मनसेमध्ये यावरुन प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक आपसात भिडत आहेत. यामुळे मराठी मतांमध्ये होणा-या मतविभागणीचा फायदा शेवटी भाजपलाच होणार आहे. त्यामुळेच हा मास्टरस्ट्रोक शिवसेनेचा नाही तर मुख्यमंत्र्यांचा आहे अशीही कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS