म्हाडा राज्यभरात 15 हजार 430 घरे उभारणार  !

म्हाडा राज्यभरात 15 हजार 430 घरे उभारणार !

मुंबई –  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन 2018-19 या आर्थिक  वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी  प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात राज्यभरात 15 हजार 430 घरांचे बांधकाम करण्यासाठी 4398.25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईतील मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितीमधील मोडकळीस आलेल्या 947 इमारतींची दुरूस्ती करण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्यभरातून चालू वर्षी (2017-18) घरांच्या विक्रीतून 741 कोटींपर्यंत रक्कम वसूल झाली. तर नवीन आर्थिक वर्षात पुणे, कोकण मंडळाकडील घरांच्या विक्रीतून 3 हजार 966 कोटी रूपये मिळण्याचा प्राधिकरणाला अंदाज आहे. म्हाडाच्या विविध मंडळांमार्फत राज्यभरात 15 हजार 430 घरांच्या बांधकामाकरिता 4398.25 कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून 2017-18 मध्ये 850 मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती करण्यात आली. तर पुढील आर्थिक वर्षी 947 इमारतींची दुरूस्ती करण्यात येणार आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून नागरी दलित वस्ती सुधार योजना, सौंदर्यीकरण, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंती बांधणे इत्यादी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामुळे मुंबईतील झोपडपट्टीवासियांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न म्हाडा करणार आहे. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाच्या सबसिडीसाठी 25.85 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान अनुदान प्रकल्पातून बांधण्यात आलेल्या इमारतींच्या देखभाल व दुरूस्तीसाठी 25 कोटींची तरतूद केली आहे.

COMMENTS