मुख्यमंत्र्यांकडून एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रय़त्न ?

मुख्यमंत्र्यांकडून एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रय़त्न ?

मुंबई – एमआयडीसीच्या जमीन प्रकरणावरुन शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नेते स्वतःही या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात आता सुभाष देसाईंसह नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा या उद्योगमंत्र्यांच्या कारभाराचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एमआयडीसीतून हजारो एकर जमीन वगळळ्याचा आरोप विरोधी पक्षांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात केला होता. यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोपही करत विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी देसाई यांची चौकशी करण्याचे जाहीर करताना माजी गृहसचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. मात्र या समितीने केवळ सुभाष देसाई यांची चौकशी केली नाही, तर राज्यात २००२ पासून उद्योग मंत्र्यांनी वळलेल्या जमीनींची चौकशी केली आहे. यात नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा यांचा समावेश आहे. चौकशी समितीने या सर्व तत्कालीन उद्योगमंत्र्यांकडून त्यांची माहिती मागवली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कांग्रेसच्या काळातील उद्योगमंत्र्यांनी सर्वात जास्त एमआयडीसीची जमीन वगळली असल्याचे या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे सुभाष देसाई यांना अडचणीत आणण्यासाठी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या पक्षाचे नेतेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल येत्या महिनाभरात मुख्यमंत्र्यांना सादर केला जाण्याची शक्यता आहे.

सुभाष देसाई यांच्या चौकशीच्या मागणीने मुख्यमंत्र्यांच्या हाती आयतचं कोलीत मिळालं होतं. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला नमवण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली. त्या समितीने केवळ देसाई यांची नाही तर चव्हाण, राणे आणि दर्डा यांच्या निर्णयाचीही चौकशी केली. त्यामुळे काँग्रेसला विशेषतः अशोक चव्हाण यांना घेरण्याची संधीही मुख्यमंत्र्यांना मिळाली. तसंच राणेंना आणखी वेटिंगवर ठेवण्याची संधीही मुख्यमंत्र्यांना मिळाली अशी चर्चा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS