भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग  !

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग !

पिंपरी – भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज सकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. महेश लांडगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. चिंचवड- थेरगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वायसीएम रुग्णालयात भेट दिली होती. त्या दिवशी आमदार लांडगे यांनी वायसीएममधील कोवीड वॉर्डची पाहणी केली होती. तेव्हापासून त्यांना कणकण जाणवत होती. अखेर रविवारी त्यांच्या घशातील द्रवाचे नुमने (स्वॅब) तपासणीसाठी पाठविण्यात आले असता आज त्याचा अहवाल आला आहे.

आमदार लांडगे यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद असल्यामुळे अनेकांशी त्यांचा संपर्क येत असतो.
शुक्रवारी आमदार लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली होती. त्यापूर्ची दोन दिवस अगोदरही आमदार लांडगे महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी आयुक्त व अन्य अधिकारी, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला होता. शिवाय, आमदार लांडगे यांच्या भोसरी येथील संपर्क कार्यालयात अनेक जण कामानिमित्त येतात. त्यामुळे त्यांना कोरोना कसा आणि कुठे झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान महेश लांडगेे यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून हो हे खरे आहे.. मला कोरोनाची बाधा झाली आहे! माझ्यावर चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.

मागील अनेक दिवसांपासून शहराचा कोरोनाचा आलेख कमी करणे व महत्वाची विकासकामे यासाठी मिटिंग घेणे, विविध ठिकाणी भेटी देणे सुरूच होते पण हरकत नाही कोरोना सोबत जगणे स्वीकारले पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
#PCMCFightsCorona

COMMENTS