मोदींना वाकवण्याची ताकद फक्त शेतकऱ्यांमध्येच – शेट्टी

मोदींना वाकवण्याची ताकद फक्त शेतकऱ्यांमध्येच – शेट्टी

पुणे – देशातील शेतकऱ्यांचा येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत महामोर्चा असून आपल्या मागण्या यामध्ये मान्य न झाल्यास 2019 ला लाल किल्ल्यावर भाषण करण्याचे स्वप्न सोडून द्या. फक्त शेतकऱ्यांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाकवण्याची ताकद असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते निंबूत येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

 

यावेळी खा. राजू शेट्टी म्हणाले की, सध्या ऊस पीक सोडले तर इतर कोणत्याही शेतमालाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. ऊस उत्पादक जसा जागरूक आहे तसेच इतर शेतकऱ्यांनी जागरूक होण्याची गरज आहे. केंद्र सरकार कच्चे तेल आयात करत असल्याने सोयाबीनचे दर पडलेले आहेत. शेतकरी संघटनेने अनेकदा केंद्र सरकारचे साखर आयतीचे धोरण हाणून पडल्यानेच साखरेचे दर टिकलेले आहेत. डिझेलच्या किमती, मशागतीचे दर, खतांच्या किमती गगनाला भिडल्याने शेतकरी तोट्यात गेला आहे.  शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टरवर 28 टक्के जीएसटी मात्र चैनीसाठी लागणाऱ्या आलिशान कारवर केवळ 6 टक्के जीएसटी यामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. पाच वर्षांपूर्वी देशातील शेतकऱ्यांवर 9 लाख कोटींचे कर्ज होते. आता ते पाच लाख कोटीने वाढून 14 लाख कोटींवर गेले आहे. याला सरकारची चुकीचे धोरणे जबाबदार आहेत. त्यामुळे या कर्जाची जबाबदारी सरकारनेच घ्यावी, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

 

ज्यांना बोट धरून शेतकऱ्यांच्या घराघरात नेले, तेच आज शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत. मात्र, त्यांना शेतकऱ्यांच्या घरातून हाकलून लावण्याची ताकत आजही मनगटात आहे, असा टोला शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री खोत यांचे नाव न घेता लगावला.

 

COMMENTS