… तर भाजपच्या बालेकिल्ल्यात सरदार तारासिंग शिवसेनेचे उमेदवार होणार ?

… तर भाजपच्या बालेकिल्ल्यात सरदार तारासिंग शिवसेनेचे उमेदवार होणार ?

विधानसभेची निवडणूक आता एक ते सव्वा वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता कामाला सुरूवात केली आहे. तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच मतदारसंघातला संपर्क वाढवायला सुरूवात केली आहे. मुंबईतील मुलुंड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरदार तारासिंग तिथून भाजपच्या तिकीटावर मुलुंडमधून निवडूण येत आहेत. मतदारांसाठी 24 तास उपलब्ध असलेला आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. तसंच अतिशय डाऊन टू अर्थ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच भाजपची व्होटबँक आणि तारासिंग यांना मानणारा वर्ग यामुळे आजपर्यंत त्यांनी मुलुंडमधून सहज बाजी मारली.

भाजपचे धुरीण सध्या मुलुंडमध्ये भाकरी फिरवण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे इतर इच्छुक मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्यात तिकीटासाठी जोरदार चुरस आहे. मात्र सरदार तारासिंग हेही पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र भाजपकडून तिकीट न मिळाल्यास ते हातात शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेतर्फे निवडणूक लढवतील अशी मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.

गेल्यावेळीही तारासिंग यांना भाजपकडून तिकीट नाकरण्यात आलं होतं. तेंव्हा त्यांनी थेट मातोश्री गाठली होती. त्या दबावापुढे झुकत भाजपनं त्यांना पुन्हा तिकीट दिले होते. शिवसेनेलाही मुलुंडमध्ये चांगला चेहरा नाही. त्यामुळे काही मराठी मते आणि तारासिंग यांची मते या जोरावर ते जागा खेचून आणू शकतील असं शिवसेनेला वाटतंय. त्यामुळे शिवसेना त्यांना तिकीट देईल अशी अटकळ आहे. गेल्यावेळी तारासिंग यांचं दबावतंत्र यशस्वी झालं होतं. यावेळी काय होतं त्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS