मुंबई – कमला मीलमधील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मंगळवारी राज्यपाल सी विद्यासागरराव यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवावी आणि आयुक्तांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी स्पष्ट मागणी विखे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान कमला मील कंपाऊंडमधील ‘मोजोज बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्याच्या घटनेसाठी मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे. मुंबई शहरातील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम आणि तिथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची मुंबई महानगर पालिकेला संपूर्ण माहिती आहे. तरीही त्याविरूद्ध कारवाई केली जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.तसेच आग लागलेल्या दोन्ही हॉटेल्समध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालविले जात होते. त्यांच्याकडे अनधिकृत व असुरक्षित बांधकाम करण्यात आलेले होते. ही बाब अग्नीशमन विभागाच्या अहवालातही नमूद करण्यात आली आहे.
त्यामुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट, निष्क्रिय व उदासीन कारभारामुळेच कधी आग लागून तर कधी इमारत कोसळून निष्पाप मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.तसेच कमला मील व साकिनाका येथील फरसाण मार्टची आग व त्याचप्रमाणे घाटकोपर व भेंडीबाजार येथील इमारत कोसळण्याच्या चार घटनांमध्ये तब्बल 76 बळी गेले आहेत. या मृत्युंसाठी केवळ पालिकेचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याने आयुक्तांसह सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर भादंविच्या 302 कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली त्यावेळी केली आहे.
COMMENTS