मुंबई महापालिकेतील समिकरणे बदलू शकणा-या आजच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष !

मुंबई महापालिकेतील समिकरणे बदलू शकणा-या आजच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष !

मुंबई : मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्य 6 नगरसेवकांच्या प्रकरणात आज कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. मनसेनं त्या पक्षांतराला विरोध केला आहे. पक्षांतर केलेल्या ‘त्या’ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देऊ नये, तसंच त्यांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या पक्षांतरामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करीत मनसे आणि भाजपने लाचलुचपत विभागाकडेही तक्रार केली आहे. तिथेही त्यांची चौकशी सुरू आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मनसेच्या सात पैकी 6 नगरसेवकांनी मनसेच्या इंजिनाची साथ सोडून हातात शिवबंधन बांधलं होतं. फेब्रुवारीमध्ये झालेल्या सार्वत्रित निवडणुकीत पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या सदस्य संख्येमध्ये फारसं अंतर नव्हतं. त्यातच भांडुपमध्ये झालेल्या पोटनिवडणुकी भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे पुन्हा अंतर आणखी कमी झाले. भाजप सदस्य संख्येत पुढे जाईल अशी भिती शिवसेनेला होती. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावून शिवसेनेनं सदस्य वाढवली होती. भाजपही त्या सहा नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात होते अशी चर्चा होती. त्या आधीच शिवसेनेनं खेळी केल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.

आजच्या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय समिकरणे बदलू शकतात. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त नेमका काय निकाल देतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.  दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, अर्चना भालेराव अशी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

COMMENTS