मुंबई – मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी लेटलतीफ पदाधिका-यांना अद्दल घडवण्यासाठी दणका दिला आहे. या कार्यकर्त्यांनी शुभेच्छांसाठी आणलेले हार, तुरे खुर्चीला चिकटवून निघून गेले आहेत. वरळीतील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी वाहतूक सेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. परंतु दोन तास होऊनही कार्यालयात संजय नाईक आले नसल्यामुळे या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्च्यांना हार अडकवून निघून गेले आहेत. या घटनेची सध्या शोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची वाहतूक सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. संजय नाईक यांना वाहतूक सेनेचे अध्यक्ष, नितीन नांदगावकर यांना सरचिटणीस आणि चंद्रकांत वंदे यांची खजिनदार पदावर नेमणूक केली आहे. याबाबत पक्षाचे वरळी विभागातील पदाधिकरी संजय जामदार हे संजय नाईक आणि त्यांच्या सहका-यांना वाहतूक सेनेच्या एल्फिस्टन रोड येथील कार्यालयावर शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. परंतु संजय जामदार यांनी संजय नाईक आणि त्यांच्या सहका-यांची दोन तास वाट पाहिली तरी आले नाही. त्यामुळे शेवटी कंटाळून जामदार यांनी उपहासात्मक पद्धतीनं आपल्या भावना नाईक यांच्यापर्यंत पोचवल्या. शुभेच्छा देण्यासाठी सोबत आणलेले हार,तुरे त्यांनी संजय नाईक तसंच त्यांच्या सहका-यांच्या खुर्चीला अडकवून कार्यालयातून निघून गेले. एवढच नाही तर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील केले आहेत.
COMMENTS