मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीने नोटिसा पाठवण्याचे सत्र सुरू असताना भाजपच्या नेतेही विविध गुन्ह्यांच्या निमित्ताने चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. काहीदिवसांपूर्वी गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता प्रसाद लाड यांना मुंबई महानगरपालिकेच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आले आहे.
मागील वर्षभरापासून राज्यातील महाविकास आघाडीतील विविध नेत्यांना ईडीच्या माध्यमातून नोटीस पाठवून चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला जात होता. या घटनामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता भाजपच्या नेत्यांच्या मागेही विविध गुन्ह्यांच्या निमित्ताने चौकशी सुरू होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती गिरीश महाजन यांच्यावर मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 2014 साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता मुंबई पोलिसांकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.
COMMENTS