निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उत्तर मुंबई शिवसेनेतील खदखद बाहेर !

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उत्तर मुंबई शिवसेनेतील खदखद बाहेर !

मुंबईत नुकतीच संघतनेत फेरबदल करण्यात आले. भाकरी फिरवल्यानंतर पक्षातील खदखद बाहेर येऊ लागली आहे. उत्तर मुंबईतील विभाग संघटक पदावरुन रश्मी भोसले यांना हटवून त्यांच्या जागी सुजाता शिंगाडे यांना पद देण्यात आलं आहे. विभाग प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार विलास पोतणीस, आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेविका शितल म्हात्रे यांनी आपल्याला खूप त्रास दिला. अवहेलना केली तसंच खोटेनाटे आरोप करुन चारित्रहणन करण्याचा प्रय़त्न केला असा आरोप रश्मी भोसले यांनी केला आहे. तसं ट्विटच त्यांनी करुन आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली आहे. पक्ष श्रेष्ठींनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उफाळल्याने त्याचा फटका पुन्हा शिवसेनेला बसू शकतो. 2014 च्या निवडणुकीपूर्वी असाच वाद उफाळला होता. तेंव्हा नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांनी तत्कालीन विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यावर आरोप केले होते. माध्यमातून हे प्रकरण चांगलं चर्चीलं गेलं होतं. त्याचा फटका निवडणुकीत शिवसेनेला बसला. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणा-या दहीसर विधानसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांचा पराभव झाला आणि भाजपाच्या मनिषा चौधरी यांनी अनपेक्षीतपणे बाजी मारली होती.

आताही लोकसभेची निवडणूक 6 महिन्यांवर तर विधानसभेची निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली आहे. विधानसभेसाठी आता दहीसरमधून शीतल म्हात्रे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले भास्कर खुरसुंगे यांच्याही नावाची चर्चा आहे. तसंच घोसाळकर यांचाही दावा असणारच. रश्मी भोसले यांनी केलेल्या आरोपामुळे पक्षाची हाणी होऊ शकते. शिवसेनेच्या वरीष्ठांनी वेळीच हस्तक्षेप करुन वाद थांबवला नाही तर गेल्यावेळीप्रमाणे यावेळीही या वादाचा फटका पुन्हा एकदा शिवेसनेला बसू शकतो.

COMMENTS