गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द

बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबरला परळी येथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेनंतर 12 तारखेचा गोपीनाथ गडावरील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार होते.परंतु या दुर्घटनेमुळे पंकजा मुंडे यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आपण कुटुंबासह गोपीनाथ गडावर लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार असल्याचं त्या म्हणाल्यात.

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे आहेत. या कारखान्यातील उकळत्या ऊसाच्या रसाची टाकी फुटून मोठी दुर्घटना शुक्रवारी घडली. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी आहेत. याबाबत त्यांनी रविवारी मृतांच्या कुटुंबियांची आणि जखमींची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तसेच त्यांना मदतही जाहीर केली.  पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. व कारखान्याचे सर्व कर्मचारी, संचालक मानसिक धक्क्यात आहेत. मी या भागाची लोकप्रतिनिधी, पालक व कारखान्याची अध्यक्षा म्हणून दुःखी आहे. वैद्यनाथ कारखाना हा लोकनेते मुंडे साहेबांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. व त्यांच्या पश्चात वैद्यनाथ सहकारी कारखाना हे त्यांच्या कष्टाचे  व स्वप्नाचे प्रतिक म्हणून आमच्यासाठी हा जिवाभावाचा विषय आहे. तसेच शोकाकुल परिवार हा कारखान्याशी अनेक वर्षे संबधीत असल्यामुळे तो आमचा परिवार आहे. त्यामुळे मी मुंडे साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द केला असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS