नागपूर – भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपमधील आणखी काही आमदार आणि खासदार भाजपच्या वरिष्ठांवर नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाराज असलेले हे नेते आता बंडाच्या तयारीत आहेत. आता विदर्भातीलच भाजपचे आमदार विकास कुंभारेही नाराज असल्याची चर्चा असून ते आता बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसेच विकास कुंभारे हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान हलबा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार विकास कुंभारे यांनी सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुन त्यांनी अनेकवेळा सरकारवर जाहीर टीकाही केली आहे. त्यामुळे आमदार कुंभारे हे भाजपविरोधात लवकरच बंड पुकारणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच ते कॉंग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. कुंभारे यांच्याबरोबरच भाजपचे विदर्भातील इतर नेतेही सरकारवर नाराज असल्याचं दिसत आहे. विधान परिषद सदस्य नागो गाणार यांनी राज्य सरकारच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. राज्यात कंपन्यांना शाळा उघडण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाला भाजपचे आमदार गाणार यांनी विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर आमदार आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. केंद्र सरकारच्या विरोधात उघडपणे उतरलेले खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
विदर्भातील बहुतेक आमदार कॉंग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. कॉंग्रेसमधून आलेल्या आमदार व खासदारांना योग्य वागणूक मिळत नसल्याची चर्चा सुरू आहे. तसेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे हे आमदार लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देतील असे संकेत वर्तवले जात आहेत.
COMMENTS