नागपूर – काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थराज्यमंत्री अॅड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांचं बुधवारी निधन झालं आहे. ते 86 वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असून ते फुफ्फुसाच्या त्रासामुळे गेली अनेक दिवसांपासून त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार कन्या आहेत. गुरुवारी त्यांच्या रामटेक या मूळ गावी त्यांच्यावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेली अनेक दिवसांपासून त्यांच्यावर धंतोली येथील गेटवेल रुग्णालयात उपचार सुरु होते.किंमतकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आपण एका मोठ्या मार्गदर्शकाला मुकलो असल्याचं ते म्हणाले आहेत. किंमतकर यांनी फडणवीस यांना आमदार असताना विदर्भाच्या अनेक मुद्यांवर माहिती देण्याचं काम केलं होतं.
मामासाहेब किंमतकर यांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो : मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची शोकसंवेदना pic.twitter.com/sXc1Jr7km1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 3, 2018
दरम्यान मामा किंमतकर यांची विदर्भाच्या अनुशेषाचे व प्रश्नांचा गाढे अभ्यासक म्हणून ओळख होती. विद्यार्थीदशेत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नरेंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार चळवळीत भाग घेतला होता. कामगार चळवळीचे प्रश्न मांडत असताना त्यांनी काँग्रेसशी नाळ तोडली नाही. 1980 मध्ये ते पहिल्यांदा रामटेकमधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात अर्थराज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
दरम्यान 1994 मध्ये विदर्भ वैधानिक मंडळाची स्थापना झाल्यानंतर राज्य शासनाने त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही त्यांचा अभ्यास बघून विदर्भ वैधानिक विकास मंडळावर तज्ञ सदस्य म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आली होती. असा दांडगा अनुभव असलेल्या नेत्याच्या जाण्यानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
COMMENTS