नाना म्हणाले, ‘राज ठाकरेंच काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत कमी झालं; यावर मनसेने काय दिलं उत्तर?

नाना म्हणाले, ‘राज ठाकरेंच काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत कमी झालं; यावर मनसेने काय दिलं उत्तर?

पुणे – “प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत कमी झालं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. नाना पाटेकर आज पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी, ‘नाना पाटेकर यांना भैया भूषण पुरस्कार स्पर्धेत सामील करा’, असे ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलं आहे.  या अगोदरच्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टार्गेट केलं आहे. तसेच त्यांना देखील भैय्या भूषण पुरस्कार नक्की मिळेल असं ट्विट केलं होतं.

मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने बोलले होते. “भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता,” असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता. नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. “नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

“महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला,” असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली.

या विषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, राज ठाकरे यांचे वैयक्तिक काही नुकसान झाले नाही. पण मनसेचं एक मत कमी  झाल्याचे सांगत नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. नाना पाटेकर यांच्या या भूमिकेवर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS