नाशिकमध्ये पोटनिवडणुक होणारच, ‘हे’ आहे त्याच्यामागचं राजकीय गणित !

नाशिकमध्ये पोटनिवडणुक होणारच, ‘हे’ आहे त्याच्यामागचं राजकीय गणित !

नाशिक – नाशिक महापालिकेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणुक होण्याची दाट शक्यता आहे. भोसले यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार देणार नाही अशी भूमिका दोन्ही काँग्रेस पक्षाने घेतली होती. त्यानंतर भोसले यांच्या कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार दिला नाही तर आपणही उमेदवार देणार नाही अशी भूमिका प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवेसनेनं घेतली होती. मात्र पालिकेतली राजकीय गणिते पाहता भाजपने ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे प्रभाग 13 मध्ये पुन्हा एकदा राजकीय धुळवड होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमागे पालिकेतली राजकीय गणिते आहेत.

 

निवडणूक लागण्यामागे काय आहेत राजकीय गणिते ?

पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या निवडणूक लागण्यामागे आहेत. सध्या महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपचे 9 सदस्य आहेत. शिवसेनेचे 4, दोन्ही काग्रेसचे प्रत्येकी 2 आणि मनसेचा एक सदस्य आहे. गेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपला मनसेनं साथ दिल्यामुळे भाजपचा स्थायी समितीचा अध्यक्ष निवडूण आला. आता या पोटनिवडणुकीत जागा जिंकून भाजप आपलं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे स्थायी समितीसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यामुळे ते पोटनिवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. आता भाजपने तयारी सुरू केल्यानंतर आता शिवसेनेनंही मग निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही जागा जिंकल्यास शिवसेनेचेही स्थायी मधील संख्याबळ वाढणार आहे. तसं झालंच तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस  यांचे स्थायीचे 9 सदस्य होतील आणि भाजपचेही तेवढेच. त्यामुळे स्थायीवर ताबा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना आमने सामने उतरण्याच्या तयारीत आहेत.

COMMENTS