नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवात यंदा निर्मलवारी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान स्वच्छता, शुद्ध पाणी आणि मलनिस्सारण प्रक्रियेवर यात्राकाळात भर देण्यात येणार आहे. या अभियानासाठी राज्य सरकारने ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या सुविधा अल्पावधीत उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. १२ जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ यात्रोत्सव साजरा होणार आहे.
या उत्सवासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो वारकरी येत असतात. यादरम्यान राज्यभरातील वारक-यांच्या दिंड्या त्र्यंबकनगरीत विसावतात. दरवर्षी कुशावर्तात स्नान, त्र्यंबकेश्वर मंदिरासह संत निवृत्तीनाथ समाधीचे दर्शन या पद्धतीने यात्रा पार पडत असते. याधरम्यान भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळते. त्यामुळे या यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय टाळता यावी आणि गर्दीचे व्यवस्थापन करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. या सर्वांसाठी शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती आणि उपाययोजना अशा दोन टप्यांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी आणि आरोग्याच्या जपणुकीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे या अभियानाची अंमलबजावणी करण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे.
COMMENTS