मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या विकासाचा पुरता बोजवारा,  नाशिककरांवर पश्चातापाची वेळ !

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या विकासाचा पुरता बोजवारा,  नाशिककरांवर पश्चातापाची वेळ !

नाशिक – पूर्वीच्या सत्ताधा-यांनी नाशिकच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले नाही, म्हणून मोठ्या अपेक्षेने नाशिकरांनी विधानसभेत भाजपला 100 टक्के यश मिळवून दिले. विधानसभेत एवढे यश मिळाल्याने त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणूकीतही भाजपला मत देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नाशिकरांना केलं. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाशिकरांनी महापालिकाही भाजपच्या ताब्यात दिली. मात्र विधानसभा निवडणुकीला साडेतीन वर्ष झाल्यानंतर आणि महापालिका निवडणूक होऊन जवळपास वर्ष होत आलं असताना नाशिककरांच्या हाती फारसं काहीच लागलं नाही. उलट त्यांच्यावर पश्चितापाची वेळ आली असंच म्हणावं लागेल. याच साठी केला होता का ? अट्टाहास असा सवाल आता नाशिकर स्वतःलाच विचारु लागले आहेत.

भाजपच्या तिन्ही आमदारांची तोंडे तीन दिशेला आहेत. पक्षातील अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभाव यामुळे शहराच्या विकासाचा पुरता बोजवारा उडाल्याचं दिसून येत आहे. गुन्हेगारांना पवित्र करून घेण्यापासून ते चक्क कुख्यात गुंडांची तडीपारी थांबविण्यापर्यंतचे उद्योग सध्या सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आमदारांचे हे किस्से मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्याने त्यांनी तीनही आमदरांना बोलावून घेतल्याची चर्चा आहे. तसंच सर्व आमदारांना एकत्र बसून एकजूटीने काम करण्याचा सल्ला दिल्यांचही बोललं जातंय. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तरी त्यांच्यात बदल होतो का ते पहावं लागेल.

महापालिका निवडणुकीच्या काळात शहरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भाजपता प्रवेश देण्यात आला होता. मात्र त्यांच्या कथीत कारनाम्यांमुळे या मंडळींना तुरुंगाची हवा खावी लागली. तुरुंगात गेल्यावर सुद्धा त्यांना सोडविण्यासाठी राजकीय प्रभाव वापरण्यात येत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. काहींच्या तडीपारीच्या नोटीसाही रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जातंय. या  सर्व गोष्टी शहरवासियांपासून लपून राहिलेल्या नाहीत. पालकमंत्री गिरीष महाजन व शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांच्यातील जवळीक सर्वश्रूत आहे. हे दोघेच परस्पर निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करत असतात अशी ओरड आता भाजपच्याच गोटातून सुरू झाली आहे.

एक विद्यामान आमदार आणि उपमहापौर यांच्यात रुग्णालयाच्या उभारणीवरून मध्यंतरी चांगलाच वाद उफाळला होता. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे शहरवासियांचे चांगलेच मनोरंजन झाले. शेवटी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करून या वादाला पूर्णविराम दिला. एकूणच पक्षाची शिस्त, नियम, धोरण याचा मागमुसही या लोकप्रतिनिधींना नसल्याचं चित्र सध्या शहरवासियांना दिसत आहे.

गटातटाच्या राजकारणाने शहराची पुरती वाट लागली असल्याचं चित्र आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विविध विकास कामांच्या घोषणा झाल्या, त्यात एलईडी लाईट, स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक, फाळके स्मारकचा प्रश्न आदी गोष्टी केवळ कागदावरच नाचताना दिसत आहेत. एलईडी लाईटचा विषय आर्थिक संबंधांमुळेच बराच चर्चीला गेला. शहरात मुळात असलेल्या घंटागाड्याच अनेक ठिकाणी येत नाहीत, आल्या तर त्या वेळेवर येत नाहीत, त्यामुळे ब-याच ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे चित्र खुद्द महापौरांच्याच पहाणी दौ-यात दिसून आले. डस्टबीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. एकूणच काय तर सर्व सत्ता हाताशी असून देखील केवळ हितसंबंध, हेवेदावे यामुळे विकास कामांचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र आहे.

COMMENTS