डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार, अजित पवारांकडे ‘ही’ दोन्ही महत्त्वाची खाती नाही?

डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार, अजित पवारांकडे ‘ही’ दोन्ही महत्त्वाची खाती नाही?

मुंबई – महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 16 तारखेपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यामुळे तातडीने हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. यात सर्वांचं लक्ष लागलं होतं ते गृहखात्याकडे. हे खातं राष्ट्रवादीकडे जाईल असं बोललं जात होतं. परंतु गृहखातं हे शिवसेनेकडे गेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्का बसला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान गृहखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आग्रही असल्याची चर्चा होती. परंतु गृहखातं शिवसेनेकडे गेलं आहे. तसेच उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी दुसऱ्या नावाचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाणार याबाबत चर्चा रंगली आहे.

तसेच हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सहा मंत्रीच दिसणार आहेत. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

COMMENTS