बीड – लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात तीन ते चार महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठं यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 पैकी 5 मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. या निवडणुकीत उमेदवारांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वेळ मिळावा या हेतूने उमेदवारांची नावे निश्चित करण्यावर पक्ष नेतृत्वानं भर दिला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान जिल्ह्यातील बीड, गेवराई, केज, परळी, माजलगाव या पाच मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. यामध्ये बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराईतून अमरसिंह पंडित किंवा विजयसिंह पंडित, माजलगावमधून प्रकाशदादा सोळंके, परळीतून धनंजय मुंडे तर केजमधून नमिता मुंदडा, यांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे.
तर आष्टी – पाटोदा मतदारसंघाचा तिढा अजून सुटला नसल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघात दोन प्रबळ दावेदार आमनेसामने आहेत. यामध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सतिश बप्पा शिंदे आणि बाळासाहेब आजबे यांचा समावेश आहे. त्यामुळे या दौघांपैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS