‘या’ मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे जाणार, राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी?

‘या’ मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे जाणार, राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी?

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या इच्छुकांना उमेदवारी देण्याचा पेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांपुढे निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आले आहेत. परंतु आगामी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे काही मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला जाणार आहेत. काँग्रेसच्या वाटेला गेलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी होणार आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा समावेश आहे. परंतु हा मतदारसंघ जर आघाडीत काँग्रेसकडे गेला तर या नेत्यांची कोंडी होणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेकडून हर्षवर्धन पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मुख्य दावेदार मानले जात आहेत.

त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली तर याठिकाणी राष्ट्रवादीतील नेत्यांच्या नाराजीमुळे हर्षवर्धन पाटील यांच्याही अडचणी वाढणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. इंदापुरातून खासदार सुप्रिया सुळे यांना जवळपास 70 हजार मतदान मिळाल्यामुळे शरद पवार त्यांच्यावर खूश आहेत. त्यामुळे आघाडी झाली तर राष्ट्रवादीतील इच्छुकांची मात्र मोठी कोंडी होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS