मुंबई – राज्यभरात राज्य सरकारविरोधात गेली काही दिवसांपासून सुरु असलेला राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा आता पश्चिम महाराष्ट्रात धडकणार आहे. कोल्हापूर ते पुणे असा हा मोर्चा निघणार असून 2 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान याचं वेळापत्रक ठरवण्यात आलं आहे.पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची पहिली सभा सकाळी दहा वाजता कोल्हापूरच्या मुरगड येथून होणार आहे. त्यानंतर जयसिंगपूर, आटपाडी, जत, मिरज, शिराळा, सांगली, महूद, सोलापूर, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, दहिवडी, कोरेगाव, सातारा, पाटण, शिरूर, जुन्नर, भोसरी, खेड, मावळ, पुरंदर, दौंड आदी ठिकाणी आंदोलनाच्या सभा होणार आहेत. हे आंदोलन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली होत असून यावेळी, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
डिसेंबर २०१७ पासून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप-सेना सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन पुकारले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीनं हल्लाबोल मोर्चा काढला आहे. विदर्भात १५६ किलोमीटरची पदयात्रा काढत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनामध्ये जनता रस्त्यावर उतरलेली यावेळी पाहायला मिळाली. त्यानंतर तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रात पार पडला असून आता राज्य सरकारविरोधात पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल होणार आहे.
COMMENTS