नाशिक – सध्या सुरू असलेलली पक्षांतरे पाहून सध्याच्या राजकारणात निष्ठेला आणि विचारांना काडीचीही किंमत नसल्याचं दिसून येतंय. कालचे धर्मनिरपेक्षवादी आजचे हिंदुत्ववादी बनत आहेत. तर कालचे हिंदुत्ववादी आजचे धर्मनिरपेक्षवादी बनत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते हरिभाऊ महाले हे मालेगाव मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर अनेकवेळा खासदार झाले. कायम त्यांनी समाजवादी विचारांची बाजू घेतली. त्यांच्या चिरंजीवांनी मात्र आता इकडून तिकडे मुक्तपणे उड्या मारल्या आहेत आणि आताही मारत आहेत.
धनराज महाले यांना जनता दलातून शिवसेनेत उडी मारली. शिवसेनेकडून ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. मात्र 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तिकीटही मिळवले. मात्र त्यात त्यांचा परभाव झाला. आता केवळ पाचच महिन्यात ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. आज त्यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश झाला आहे. आता ते पुन्हा विधानसभेला शिवसेनेच्या तिकीटावर दिंडोरीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
महाले यांनी जशा इतकडून तिकडे उड्या मारल्या आहेत. तशी राष्ट्रवादीची तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं लागलं अशी अवस्था झाली आहे. लोकसभेच्यावेळी स्वपक्षातील इच्छुक आणि प्रबळ दावेदार असलेल्या डॉ. भारती पवार यांना डावलून धनराज महाले यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यांना लोकसभेचे तिकीटही दिले. त्यामुळे नाराज भारती पवार यांनी आयतीच भाजपात उडी मारली आणि त्या खासदार म्हणून निवडूणही आल्या. राष्ट्रवादीने भारती पवार यांच्या रुपाने एक निष्ठावंत आणि आदिवासी समाजातील उच्चशिक्षीत चेहरा गमावला. दिंडोरी लोकसभेची जागा तर गमावलीच शिवाय धनराज महालेही सोडून गेले हाती काहीच लागले नाही.
COMMENTS