मुंबई- राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान यूपीए- १ च्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विमान वाहतूकमंत्रीपदाचा कार्यभार होता.त्यावेळी आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देण्यात आले होते. या चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरु असून याप्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.
दीपक तलवार हा सध्या तुरुंगात असून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील न्यायालयाने म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावला आहे.
COMMENTS