राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता आज शिवसेनेच्या व्यासपीठावर, पक्षात प्रवेशही करणार?

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता आज शिवसेनेच्या व्यासपीठावर, पक्षात प्रवेशही करणार?

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेच्या व्यासपीठावर जाणार असल्याची माहिती आहे. तसेच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थोड्याच वेळात मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. या सभेदरम्यान जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता अशी माहिती आहे.

दरम्यान याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.  गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS