राष्ट्रवादीकडून रायगड जिल्ह्यात  मोठा फेरबदल, जिल्हाध्यक्ष पदावरील दत्तात्रय मसुरकर यांची तडकाफडकी उचलबांगडी !

राष्ट्रवादीकडून रायगड जिल्ह्यात मोठा फेरबदल, जिल्हाध्यक्ष पदावरील दत्तात्रय मसुरकर यांची तडकाफडकी उचलबांगडी !

रायगड – रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनेत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष पदावरील दत्तात्रय मसुरकर यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. या ठिकाणी पक्षाचे निष्ठावंत आणि खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार सुरेश लाड यांची नियुक्ती केली. याबाबत ते स्वतः आज सुरेश लाड यांना पेण येथे नियुक्तीचं पत्र देणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश लाड यांना जिल्हाध्यक्ष पदावर निवडल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली.कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मतभेद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते.
तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. या बैठकीनंतर आज राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष पदावरील दत्तात्रय मसुरकर यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे.

COMMENTS