उस्मानाबाद- कळंब मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे भाचे राणाजगजितसिंह पाटील हे लवकरच भाजपात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मला तुमच्या काही बोलायचंय या आशयाची पोस्ट त्यांनी कार्यकर्त्याना संबोधून केली आहे. 31 ऑगस्ट रोजी परिवार सवांद नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. या परिवार संवाद कार्यक्रमामध्ये ते राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा करतील अशी शक्यता आहे.
तसेच ते 1 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे अमित शहा यांच्या हस्ते किंवा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत ते प्रवेश घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राणाजगजितसिंह पाटील यांची फेसबुक पोस्ट
आपल्यासोबत मला मनातलं बोलायचं आहे…
अगदी मनमोकळा संवाद साधायचा आहे…तुम्हीच माझ्या जिवाभावाची माणसं आहात. प्रत्येक टप्प्यावर आदरणीय डॉक्टर पदमसिंह पाटील साहेबांपासून ते आजवर मोठ्या धीरानं तुम्ही सगळेजण खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहात.
आपल्या कौटुंबिक नात्याचे ऋणानुबंध ४० वर्षांपासून घट्ट आहेत.. जिल्ह्याच्या विकासासाठी डॉक्टर साहेबांनी घेतलेले कष्ट, त्यासाठी त्यांना अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले, प्रवास चढ-उताराचा होता, पण त्यांच्या कामाची तळमळ पाहून आपण सगळेजण एखाद्या पर्वताप्रमाणे साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलात. त्यांना कायम साथ दिली. या सगळ्या कौटुंबिक स्नेहाची शिदोरी माझ्यासाठी अनमोल आहे. तुम्हा सर्वांच्या रूपाने लाभलेल्या या विस्तारित परिवाराची जबाबदारी माझ्यावर आहे. याची मला सदैव जाणीव आहे.
आपल्या सर्वांच्या समोर मी लहाणाचा मोठा झालो आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अंगाखांद्यावर खेळलो आहे. आपण लहाणाचे मोठे होताना मला पाहिलं आहे. शुद्ध अंत:करणाने प्रामाणिकपणे केलेल्या कामास आपला जो सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे त्यातूनच प्रगतीचा हा प्रवाह आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथवर आला आहे.
आदरणीय डॉक्टर साहेबांच्या प्रत्येक शब्दाला आपण काळजाच्या आत जपून ठेवलं आहे. साहेबांनीदेखील कधीच अंतर दिले नाही. जशी साथ आपण सर्वांनी साहेबांना दिलीत, तशीच नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक घट्ट सोबत मलाही लाभली आहे. एकजुटीने, एकदिलाने आपण संघर्ष केला, विकासासाठी आंदोलने केली, एकमेकांच्या सहकार्याने आणि संवादाने सर्व अडचणींचा सामना केला,अविरत कष्ट केले आणि जिल्ह्याच्या शाश्वत परिवर्तनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
आजवर जी मायेची ऊब आणि सक्षम साथ आपण सर्वांनी दिली, यापुढेही ती अशीच राहील असा माझा दृढ विश्वास आहे. हाच विश्वास मला प्रत्येक वेळी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतो, प्रामाणिक कामासाठी जे कठीण निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी मोठे बळ देतो !!!
आजवर आपण मला जी ताकद दिली, जो विश्वास दाखविला, जे प्रेम दिले त्याविषयी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध शब्दांच्या पलीकडले असतात. आपल्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि आपल्या कौटुंबिक नात्यातील उत्साह अधिक सक्षम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित भेटू या..
बदलत्या नैसर्गिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,रोजगार निर्मितीसाठी कौडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग उभे करणे या प्रमुख प्रश्नांसह जिल्ह्याच्या निरंतर विकासासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित असून याबाबत आपल्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. या कौटुंबिक संवाद सोहोळ्यासाठी मी आपणा सर्वांना जिव्हाळ्याच्या हक्काने प्रेमपूर्वक निमंत्रण देतो !
आपल्यासोबत मला मनातलं बोलायचं आहे… अगदी मनमोकळा संवाद साधायचा आहे…तुम्हीच माझ्या जिवाभावाची माणसं आहात. प्रत्येक…
Posted by Ranajagjitsinha Patil on Thursday, August 29, 2019
COMMENTS