राष्ट्रवादी  काँग्रेसचे सोशल इंजिनिअरिंग !

राष्ट्रवादी  काँग्रेसचे सोशल इंजिनिअरिंग !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसनं काल पक्षामध्ये खांदेपालट करत युवतीच्या अध्यक्षपदाची धुरा उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि युवा कार्यकर्त्या सक्षणा सलगर यांची निवड केली. सक्षणा सलगर यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्या उच्च शिक्षीत आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या सक्रीय आहेत. सुप्रिया सुळे यांच्या त्या जवळच्या समजल्या जातात. सलगर या धनगर समाजाच्या आहेत. स्वर्गीय आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील या आजपर्य़ंत युवतीच्या अध्यक्ष होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. यापूर्वी सुनिल तटकरे यांच्याकडे ही जबादारी होती. तटकरे हे ओबीसी समाजाचे आहेत. ओबीसी नेत्याकडून प्रदेशाध्यपद घेऊन ते मराठा नेत्याकडे दिले. त्यामुळे सामाजिक बॅलंस राखण्यासाठी सक्षणा सलगर या सर्वसामान्य धनगर कुटुंबातील युवतीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशी चर्चा आहे. या निवडणीने मराठवाड्याला हे पद मिळाले आहे.

सक्षणा सलगर यांची निवड करताना राष्ट्रवादीने 2019 चे गणित डोळ्यासमोर ठेवले आहे. राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या जवळपास 3 ते 4 टक्के आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातही बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्यावेळी बारामतीमध्ये धनगर समाजाची मते महादेव जानकर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वळाली होती. त्याचा फटका सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटण्यामध्ये झाले होते. त्यामुळेच धनगर समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला हे पद देण्यात आल्याचं बोलंलं जातंय.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हे दोन्ही नेते मराठा समाजाचे आहेत. त्यानंतर धनगर, वंजारी, माळी समाजाची मोठी मतदारसंख्या आहे. वंजारी समाजातील धनंजय मुंडे यांच्याकडे आधीच पक्षाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवली आहे. तसंच आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही राष्ट्रवादीत मानाचं पान दिलं जात असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा, ओबीसी अशी मोट बांधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं यातून दिसून येत आहे. आता त्याचा नेमका फायदा पक्षाला किती होते ते पाण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणा-या पुणे ग्रामिणचं जिल्हाध्यक्षपद ब्राम्हण असलेल्या प्रदीप गारटकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा ही ब्राम्हण विरोधी पक्ष अशी झालेली आहे. त्यामुळे पुणे ग्रामिणमध्ये अनेक दिग्गज मराठा नेते असताना त्यांना डावलून प्रदीप गारटकर यांच्यकडे धुरा सोपवण्यात आली आहे. इतर कारणांसोबत राष्ट्रवादी ब्राम्हणविरोधी नाही आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे हे दाखव्यासाठी प्रदीप गारटकरांना अध्यक्षपद दिल्याची चर्चा आहे.

COMMENTS