मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक निवडणुकीची लगबग सुरू आहे. जिल्हाअध्यक्ष, शहराध्यक्षांसह प्रदेशाध्यक्षांचीही निवड होणार आहे. येत्या 29 तारखेला पुण्यात प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार आहे. सर्व पदासाठी निवडणुकी होणार आहेत अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. असं जरी असलं तरी वाद न होणा-या ठिकाणी निवडणूक पार पडेल तर वाद होणा-या ठिकाणी निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षांना दिले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या अनेक नावं चर्चेत आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. दिलीप वळसे पाटील हे सर्वांनाच मान्य होणार नाव आहे. मात्र त्यांची प्रकृतीमुळे ते हे पद स्विकारणार नाहीत अशी चर्चा आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांच्याकडे सध्या विधानसभेतील गटनेतेपद आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे दोन पदे दिली जाण्याची शक्यता कमी आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच पदावर कायम राहण्याची शक्यता आहे. सर्वांना सांभाळून घेणारे आणि अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याशी चांगला रॅपो असलेले नेते म्हणून तटकरे यांची ओळख आहे. त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. तटकरे यांच्याशिवाय शशिकांत शिंदे यांचंही नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. आक्रमक आमदार आणि कोणतेही आरोप नसलेले आणि मराठा नेता आणि अजित पवार यांच्याशी असलेली जवळीक म्हणून शशिकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत आघाडीवर आहे.यातून आता कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते हे येत्या 29 तारखेला समजेल.
COMMENTS