पुणे – राष्ट्रवादीच्या महिलांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या अनिकेत बापट या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन दिलं आहे. अनिकेत बापट यांनी राष्ट्रवादीच्या महिला या दिसायला सुंदर असतात. पक्षाचा तसा नियम आहे का ? त्यांची निवड कोण करतात अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ६ मार्चरोजी त्याने ही पोस्ट टाकली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पुण्यातील राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे.
दरम्यान अनिकेतच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादीतील सर्व महिलांमध्ये असंतोष पसरला असून ही गोष्ट सर्वच महिलांसाठी लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका बाजूला महिलांचा सन्मान केला जात आहे तर दुस-या बाजूला अशाप्रकारे घाणेरडे वक्तव्य केले जात असल्यामुळे या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाई केली नाही तर जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादीनं दिला आहे.
COMMENTS