मुंबई – जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीनं आता उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. ठाणे आणि नवी मुंबई मतदारसंघासाठी शरद पवार यांनी दोन दिग्गज नेत्यांची मुलाखत घेतली परंतु या लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार मिळत नसल्याचे समोर आले आहे. कारण या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान पवार यांनी जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांची मुलाखत घेतली. यावेळी आव्हाडांनी कल्याण लोकसभा निवडणूक लढवावी आणि नाईकांनी ठाणे लोकसभा लढवावी, अशा सूचना पवारांनी या दोघांना दिल्या. परंतु या दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे. या दोघांनीही आपण तयार नसल्याचे सांगून यातून काढता पाय घेतला आहे.
तसेच लोकसभेत पराभव झाला तरी आव्हाडांना त्यांचा कळवा-मुंब्रा मतदारसंघ दिला जाईल किंवा जिंकले तर त्या ठिकाणी त्यांच्या घरातीलच मंडळीला संधी दिली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे गणेश नाईक यांनीसुद्धा ठाणे लोकसभा लढवावी, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे नेते आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS