मुंबई – नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी तातडीने कोविड १९ टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. याबाबत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
मनसेचे पालकमंत्र्यांना खरमरीत पत्रप्रति,
मा.एकनाथ शिंदे,
मंत्री, महाराष्ट्र राज्य,
पालकमंत्री, ठाणे जिल्हा.
यांस सस्नेह जय महाराष्ट्र !
विषय – तातडीने नवी मुंबईत कोविड १९ टेस्टिंग लॅब सुरू करणे बाबत.
महोदय..
नवी मुंबई मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तीन महीने होत आले तरीही नवी मुंबई शहरात कोरोना टेस्टींग लॅब नसल्याकारणाने आजही रिपोर्ट यायला ८/१० दिवसांचा अवधी लागत आहे. अनेकांना सौम्य लक्षणे असली तरी खाजगी हॉस्पिटल ॲडमिट करुन घेते व रिपोर्ट ८/१० दिवसांनी निगेटीव्ह आले तरी भरमसाठ बिल वसुली करत आहेत. तर काही रुग्णांचे निदान लवकर न होत असल्याने उपचारास विलंब झाल्याने मृत्यू होत आहेत व संबंधित व्यक्तीचा संसर्ग अनेकांना होत आहे. आजही १०७३ नवी मुंबईकरांचे रिपोर्ट येणे बाकी आहे असे मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातच म्हटले आहे.
अनेकदा मनसेसह सर्व पक्षांनी, संस्थांनी, नवी मुंबईकरांनी लॅब सुरू व्हावी म्हणुन मागणी केली आहे. मात्र ती मागणी पालिका आणि आपल्या पर्यंत पोहचत नाही की काय की हेतुपूर्वक आपण याकडे कानाडोळा करत आहात असे आता आम्हांस वाटू लागले आहे.
सरकार म्हणतय तसे ७७ लॅब सुरु झाल्या असतील तर नवी मुंबईत लॅब सुरु करायला काय अडसर आहे ? आमचे खासदार, आमदार ICMR कडे पाठपुरावा करायला कमी पडत आहेत काय की आपल्याला व खासदारांना ठाणेतून नवी मुंबईत लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असा प्रश्न तमाम नवी मुंबईकरांना पडला आहे.
तरी येत्या १० दिवसात लॅब सुरु न झाल्यास नवी मुंबईकरांबरोबरच मनसे चे पदाधिकारी नवी मुंबईत विविध ठिकाणी मनपा प्रशासन व आपल्या विरोधात निषेध आंदोलन करतील याची आपण नोंद घ्यावी.
नवी मुंबईकरांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आपण या पत्राला उत्तर द्याल ही अपेक्षा.
धन्यवाद !
आपला,
गजानन काळे,
शहर अध्यक्ष, नवी मुंबई,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
COMMENTS