…तर तिस-या आघाडीतून नितीशकुमार ठरणार पंतप्रधानपदाचे दावेदार ?

…तर तिस-या आघाडीतून नितीशकुमार ठरणार पंतप्रधानपदाचे दावेदार ?

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा निवडणुकीत जनता दल संयुक्तचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जदयू आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर या चर्चेला उधाण आलं आहे. बिहारमधील जागावाटपावरुन नितीशकुमार हे भाजपावर नाराज असून ते काँग्रेस, राजदच्या महाआघाडीत परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान तिसऱ्या आघाडीकडे अजूनही मोदींविरोधात चेहरा नसून ममता बॅनर्जी, शरद पवारांपासून अनेक जण पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. परंतु नितीशकुमार तिसऱ्या आघाडीत आले तर तेच पंतप्रधानपदाचे दावेदार ठरु शकतात असंही बोललं जात आहे. तसेच नितीश कुमार यांना देखील दिल्लीचे वेध लागले आहेत. दिल्लीत जाण्यासाठी नितीशकुमार यांना राष्ट्रीय जनता दलाचे पाठबळ मिळू शकते. ‘नितीशकुमार यांनी २०१९ मध्ये मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवल्यास विरोधी पक्ष त्यांना पाठिंबा देऊ शकतात, असे राजदमधील नेत्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दल आणि जदयूतील एका नेत्याची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली हे माहित नसून या बैठकीत महाआघाडीबाबतच चर्चा झाली असल्याची बातमी सध्या राजकीय वर्तुळात पसरली आहे. तसेच नितीश कुमार रिंगणात उतरले तर अरविंद केजरीवालही माघार घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS