मराठवाडतला बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला, लवकरच करणार पक्ष प्रवेश ?

मराठवाडतला बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला, लवकरच करणार पक्ष प्रवेश ?

बीड – मराठवाड्यातला भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला असल्याचं दिसत आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती. परंतु भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही.भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर आता गायकवाड राष्ट्रवादीच्या गोटात जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान मराठवाड्यात जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यांनी केंद्रात दोन वेळा राज्यमंत्रिपद भूषवले आहे. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून दोनदा ते विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. दीर्घकाळ भाजपसोबत असल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांचे मराठवाड्यातील पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. परंतु त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मराठवाड्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS