मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणण्याचं ठरवलं आहे. विधानसभेत गळचेपी केली जात असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा होणार होती. मात्र, राज्यपाल अभिभाषणावर बोलू न दिल्याने विरोधक आक्रमक झाले. अनेक विषयांवर अध्यक्ष बोलू देत नसल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांविरुद्ध अविश्वास आणण्याचं ठरवलं असून याबाबत आज प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी या प्रस्तावात केली आहे. तसेच सभागृहात शिवसेना वेगळा मुद्दा घेऊन येते ,भाजप वेगळंच करते त्यामुळे लोकशाहीचा खून करायला निघाला आहात का असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. तसेच सभागृहात भोंगळ कारभार सुरू असून आम्हीपण 15 वर्ष सरकारमध्ये काम केलं. पहिल्या आठवड्यातील चार दिवस गेले, आजचा दिवस गेला ,एवढ्या सुट्ट्या आहेत काम करायला फक्त 15 दिवस मिळणार आहेत. तसेच सत्ताधारी काम न करता त्यांच्या दृष्टीने वेळ सत्कारणी लावत आहेत, आमच्या दृष्टीने मात्र वाटोळं करण्याचं काम सुरू आहे अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे. तसेच अध्यक्ष यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS