उस्मानाबाद – समाजकल्याण सभापती म्हणून महिलेऐवजी पुरुष अवतरल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार परिषदेत मंगळवारी हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्षांसह एक पुरुषही माहिती देण्यासाठी बसले. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी माहिती दिल्यानंतर संबंधीत एक तरुण पुरुष माहिती देऊ लागला.
दरम्यान पत्रकारांना समाजकल्याण सभापती या महिला आहेत, याची माहिती होती. युवक कार्यकर्ता माहिती देऊ लागल्यानंतर काही पत्रकारांनी त्याला रोखले. हे महाशय कोण आहेत. यांचा काय संबंध आहे. अशी विचारणा केल्यानंतर हे महाशय समाजकल्याण सभापतीचे चिंरंजीव असल्याचे लक्षात आले. सध्या समाजकल्याण सभापती म्हणून चद्रकला नारायणकर यांच्याकडे पदभार आहे. मात्र त्यांच्या चिरंजीवानेच पत्रकार परिषदेत माहिती दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे उपाध्यक्षा सौ. पाटील याही महिला आहेत. त्यांनीही या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे महिलांच्या जागेवर कशा प्रकारे पुरुष आपला हक्क दाखवितात, हे दिसून आले आहे.
COMMENTS