पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील पुरस्कारांची घोषणा, रा. रं. बोराडेंना ‘जीवनगौरव’ तर शामसुंदर सोन्नर यांना ‘समाजप्रबोधन’ पुरस्कार

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील पुरस्कारांची घोषणा, रा. रं. बोराडेंना ‘जीवनगौरव’ तर शामसुंदर सोन्नर यांना ‘समाजप्रबोधन’ पुरस्कार

अहमदनगर – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कारांची घोषणा झाली असून ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून ज्येष्ठ कीर्तनकार, प्रसिद्ध कवी, व्याख्याते ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना ‘समाज प्रबोधन’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबरोबर अन्य साहित्यिक पुरस्काराची घोषणाही समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी नगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील पुरस्काराचे हे २८ वे वर्ष आहे. या पुरस्कारांचे वितरण २५ आॅगस्ट रोजी दु. २.०० वाजता साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रवरा नगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील अन्य मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

ग्रामीण साहित्याला बळकटी देणारे रा. रं. बोराडे ५० वर्षांहून अधिककाळ साहित्य क्षेत्रात कार्य करीत आहेत. १४ कादंब-या, १० नाटके, ३ अनुभव कथन, बाल साहित्य, समीक्षा असे विपूल लेखन त्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील कष्टक-यांचे जीवन आणि प्रश्न त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेले आहेत. त्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे भाष्यकार, संवेदनशील कवी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर हे महाराष्ट्रात प्रबोधनाचे काम करीत आहेत. वर्तमान समाजाला अध्यात्मिक भक्तीबरोबरच भौतिक जीवनाच्या उन्नत्तीचीही आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन ते कीर्तनातून समाजजागृती करतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांनी २०१५-१६ या वर्षांत कीर्तनातून जागृती करून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोलाचे कार्य केले होते. त्याशिवाय स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, व्यसनमुक्ती याबाबत संत साहित्याचे दाखले देत ते अत्यंत प्रभावीपणे मांडणी करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘समाजप्रबोधन’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख आणि मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

इतर पुरस्कारात उत्कृष्ट राज्यस्तरीय साहीत्य पुरस्कार – बाबाराव मुसळे, पत्रकार लेखक पुरस्कार – डॉ. बाळ बोठे, विशेष साहित्य पुरस्कार – महेश लोंढे, अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – हेरंब कुलकर्णी, कलागौरव पुरस्कार- नाट्य व सिने कलावंत मिलिंद शिंदे आणि नाट्यसेवा पुरस्कार – दत्ता पाटील यांना जाहीर झाले आहेत, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी दिली आहे.

COMMENTS