उस्मानाबाद – काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षबदलाचे संकेत, अध्यक्षपदासाठी “या” नेत्याचे नाव आघाडीवर !

उस्मानाबाद – काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षबदलाचे संकेत, अध्यक्षपदासाठी “या” नेत्याचे नाव आघाडीवर !

उस्मानाबाद – गेल्या 13 वर्षांपासून न बदललेल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या बदलीचे अखेर संकेत मिळू लागले आहेत. काँग्रेसची ताकद कमी असलेल्या चार तालुक्यात अध्यक्षपद देण्याचे निश्चित झाले असून वाशी येथील प्रशांत चेडे यांचे नाव प्रथम क्रमांकावर असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. जिल्ह्यात गेल्या 13 वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद तुळजापूर येथील देवीचे पुजारी आप्पासाहेब पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसला जिल्हा परिषद तसेच अनेक पंचायत समितीत यश मिळाले. दरम्यान या कार्यकाळात काँग्रेस पक्षाची वाढ झाली ती फक्त उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा या चारच मतदारसंघात. जिल्ह्यातील नेत्यांनीही आपले गड राखण्याशिवाय इतर भागात फारसा पक्ष वाढीचा प्रयत्न केला नाही.

जेव्हा राज्य आणि केंद्र स्तरावर काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली. तेव्हा संघटनात्मक बदलासह कमकुवत ठिकाणी ताकद वाढविण्याचे प्रयत्न करण्याची गरज पक्षश्रेष्टीकडून व्यक्त होऊ लागली. तेव्हा जिल्ह्यातील काँग्रेस कामाला लागल्याचे चित्र आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षपदाची माळ काँग्रेस खिळखिळी असलेल्या चार तालुक्यात जात आहे. वाशी येथील प्रशांत चेडे यांचे नाव जवळपास निश्चित असून यावर वरीष्ठ स्तरावरून शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत. चेडे यांच्याशिवाय संजय पाटील
दुधगावकर, डॉ. स्मिता शहापूरकर, सुनिल चव्हाण, अॅड. धीरज पाटील यांची नावेही चर्चेत आली.

आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची  आघाडी होण्याचे संकेत आहेत. दुधगावकर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घेणे, कठीण असल्याने त्यांचे नाव चर्चेतून बाहेर फेकले गेले. आघाडीचे संकेत बघून त्यांनीच स्वतः या स्पर्धेतून माघार घेतली. पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे त्यांचे मानस आहे. सुनिल चव्हाण हे तुळजापूरचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. एकाच घरात दोन पदे देणे गैर असल्याचे मानत त्यानीही या पदाकरीता नकार दिला. तसेच त्यांना तुळजापूर विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत असल्याने त्यांनी स्वतःहून या स्पर्धेतून माघार घेतली आहे. अॅड. धीरज पाटील यांनी नुकतेच जि्ल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. त्याचे वडील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर आहेत. पुन्हा त्याच घरात जिल्हाध्यक्षपद देणे योग्य नसल्याने त्यांचेही नाव स्पर्धेबाहेर गेले आहे. डॉ. स्मिता शहापूरकर यांच्याही नावाची चर्चा झाली. परंतु, पक्षकार्यकर्त्यांना बसण्या उटण्यासाठी कार्यालय नाही, एकही संस्था ताब्यात नाही. असा विचार करून त्यांचे नाव बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.
चेडेंचेच नाव का ?
गेल्या पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने चेडे यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हिरावून घेतले होते. त्यामुळे चेडे कमालीचे
नाराज होते. सुरुवातीच्या काळात त्यांची अध्यक्षपद घेण्यासाठी मनधरणी करावी लागली. कळंब, भूम परंडा तालुक्यात काँग्रेसची ताकद नगण्य आहे. त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातही फारसी ताकद उरलेली नाही. या चारही तालुक्यांना उर्जा देण्यासाठी चेडे यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात आहे. पंचायत समिती, नगरपंचायत या दोन्ही संस्था चेडे यांच्या ताब्यात आहेत. तरूण आहेत, त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे. तसेच साखर कारखानाही लाँग टर्मवर चालविण्यासाठी दिला आहे. त्यामुळे त्यांच्य कार्याची दखल घेत, त्यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील गोटातून सांगितली जात आहे.

COMMENTS