बार्शी – असं म्हणतात की युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं.युद्ध मग ते रणांगणावरील असो की राजकारणातील.विशेषतः राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो.अशीच प्रचिती बार्शीत आली आहे निमित्त होतं ते दिलीप सोपल यांच्या वाढदिवसाचं.१६ डिसेंबर हा दिलीप सोपल यांचा वाढदिवस, राज्यातील अनुभवी नेत्यांपैकी एक असं हे व्यक्तिमत्व.गेल्या ४५ वर्षाच्या राजकारणात एक अजात शत्रू म्हणून गवगवा.पण एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असलं तरी स्थानिक राजकारणात मात्र विरोध हा असतोच अगदी टोकाचा त्याशिवाय पर्याय ही नसतो.राजकारणाच्या फडात समोरासमोर उभे राहिल्यावर एकमेकांची लक्तरे काढण्यात ही मंडळी व्यस्त असतात आणि त्यांना हा विरोधाचा टेम्पो कायम टिकवावा लागतो तो त्यांच्या स्थानिक राजकारणातील अस्तित्वासाठी.
पण हे सगळे प्रोटोकॉल मोडलेत भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी.१६ डिसेंबर या दिलीप सोपल यांच्या वाढदिवसादिवशी मिरगणे यांनी दिलीप सोपल यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.मिरगणे यांच्या या कृतीमुळे बार्शीचे राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे.अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत.अनेकांना यामुळे आश्चर्याचा धक्काच बसला आहे.सोपल-मिरगणे यांचा शुभेच्छा दिलेला फोटो बार्शीत चांगला व्हायरल होतोय.अनेक संमिश्र प्रतिक्रिया यावर उमटत आहेत.
बार्शीच्या राजकारणात आमदार दिलीप सोपल आणि राऊत यांच्यात मुख्य लढत मानली जाते.परंतु मिरगणे यांनी बार्शीत शिरकाव केल्याने आता तिरंगी लढत निर्माण झाली आहे.अद्याप मिरगणे यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही पण नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत किंगमेकर म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे.त्यात मुख्यमंत्र्यांची जवळीक ही त्यांची जमेची बाजू.याच जवळीकतेमुळे त्यांनी बार्शी कृषी उत्पन्न समितीवर प्रशासक म्हणून काम देखील केल आहे. याच काळात वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या दिलीप सोपल यांचा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणून त्यांच्यवर गुन्हा देखील दाखल केला आहे.
दिलीप सोपल यांना जेलची हवा खाऊ घातल्याशिवाय गप्प बसणार नाही ,छगन भुजबळ यांच्या शेजारी दिलीप सोपल यांची सोय केल्याचं ते वारंवार सभेतून सांगतात”.सोपल यांनी देखील त्यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही.असे कट्टर विरोधक असलेले नेते वाढदिवसानिमित्त एकत्र येतात हे सामान्य बर्शिकारांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे.या कृतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली.या आधी स्वतःच्या पक्षातील राऊत यांच्याशी मिरगणे याचं सख्य नसलं तरी बाजार समितीच्या निमित्ताने त्यांनी तडजोड करत तसेच मराठा समाजाच्या प्रश्नाच्या निमित्ताने एकत्र राहिले आहेत.
पण सोपल यांच्याशी गेल्या ४ वर्षात त्यांचा कसलाही संबंध आलेला नाही.मग असं असताना असं काय घडलं की मिरगणे यांना शुभेच्छा देण्याचा मोह निर्माण झाला? की शुभेच्छा हे एक निमित्त आहे. दिलीप सोपल यांच्याशी संवाद साधत आपल्याच पक्षातील राऊत यांना शह देण्याचा?की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजपला दिलीप सोपलसारखा एक सक्षम उमेदवार देऊन स्वतःचा विधानसभेचा मार्ग मोकळा करण्याचा?असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राजकीय लोक किती जरी म्हटले की आम्ही फक्त औपचारिक म्हणून भेटलो तरी त्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. या भेटीमागे नक्कीच काहीतरी शिजत असतं. अर्थात हे सगळं येणारा काळच ठरवेल.पण नेत्यासाठी एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनी यापासून नक्कीच धडा घ्यायला हवा.तसच सेना भाजप युती नाही झाली तर मिरगणे यांचं नाव भाजपा कडून लोकसभेसाठी पुढे असण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी दिलीप सोपल यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला का?कारण उस्मानाबाद लोकसभेत जिकडे बार्शी तिकडं सरशी अशीच काही परिस्थिती असते.
प्रशांत आवटे ,बार्शी
COMMENTS