पालघरचा गड कोण मारणार ?  वसई, नालासोपारामध्ये टक्का घसरल्याचा फायदा कोणाला ?

पालघरचा गड कोण मारणार ?  वसई, नालासोपारामध्ये टक्का घसरल्याचा फायदा कोणाला ?

पालघर – पालघर पोटनिवडणुकीत काल ईव्हीएम बंदच्या काही तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडलं. सर्वच पक्षांनी जोर लावल्यामुळे पोटनिवडणुक असूनही 53.22 टक्के मतदान झालं. शहरी आणि ग्रामिण भागात जवळपास सारखेच मतदान झाल्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. विशेषत वसई आणि नालासोपारा या दोन शहरी मतदारसंघात कमी मतदान झालं. त्यामुळे टक्केवारी घसरल्याचा फायदा कोणाला होतो ते पहावं लागले.

या पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस या सर्वच पक्षांनी जोर लावला होता. साधारणणे वसई, बोईसर आणि नालासोपारा या शहरी भागावर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. तर विक्रमगड, डहाणू आणि पालघर या ग्रामिण मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात काटे की टक्कर आहे. तर काही पॉकेट्समध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष आहेत. शहरी भागात एकूण मते जास्त आहेत. त्या तुलनते ग्रामिणमध्ये मते कमी आहेत. मात्र झालेले एकूण मतदान पाहता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यांचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.

दिवंगत चिंतामण वनगा यांचं गाव डहाणू मतदारसंघात येतं. इथे भाजपची ताकद चांगली आहे.  मात्र या ठिकाणी श्रीनिवास वनगा यांना सहानभुतीचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे इथून भाजपने आघाडी घेतली तरी फार मोठी नसेल अशी चर्चा  आहे. शिवसेनाही भाजपच्या जवळपास मते घेईल असा अंदाज आहे. तर याच मतदारसंघात डाव्या पक्षाचीही ताकद आहे. त्यांनाही इथून ब-यापैकी मतदान होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला इथून फारसी मते मिळणार नाही अशी शक्यता आहे.

विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक 62 टक्के मतदान झालं आहे. पालकमंत्री विष्णू सावरा यांचा हा मतदारसंघ आहे. 2014 मध्ये श्रीनिवास वनगा यांना या मतदारसंघात चांगली मते मिळाली होती. मात्र 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सावरा फक्त 2900 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे वाढलेली मते ही कोणाच्या पारड्यात जातात, त्यावरच या मतदारसंघातून कोण आघाडी घेणार याचं गणित अवलंबून आहे. पालघर हा भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा मतदारसंघ. या मतदारसंघातून गावित यांना चांगले मतदान होईल अशी अपेक्षा आहे. मात्र गेल्या दोन निवडणुकीत गावित यांना या विधानसभा मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला आहे. सध्या शिवसेनेचे अमित घोडा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे शिवसेनेला या मतदारसंघातून निसटती का होईना आघाडी मिळेल असा अंदाज बांधला जात आहे.

बोईसर, नारासोपारा आणि वसई हे तीन मतदारसंघात सध्या बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. हे तीनही मतदारसंघ वसई विरार महापालिका क्षेत्रात येतात. बोईसरमध्ये भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांना जवळपास समसमान मेत असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर नालासोपारा या  विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान आहे. या मतदारसंघात तब्बल 4 लाख 32 हजार मतदार आहेत. वसईमध्ये सुमारे पावणेतीन लाख तर इतर मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतदार आहेत. नालासोपारमध्ये सर्वाधित मतदार असूनही तिथे केवळ 34.83 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी असलेले उत्तर भारतीय मते भाजपकडे वळतील असा अंदाज आहे. मात्र घसरलेला टक्का आता कोणाला त्रासदायक आणि कोणाला फायदेशीर ठरतो ते पहावं लागेल.

वसई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हिंतेद्र ठाकूर करत आहेत. याही ठिकाणी मतदान कमी झाले आहे. त्यातच श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडीत यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांचीही वसईतल्या ग्रामिण भागात चांगली ताकद आहे. घसरलेल्या टक्क्याचा कुणाला फटका बसतो आणि विवेक पंडीत भाजपला किती मते मिळवून देतात यावरच इथून बविआला किती आघाडी मिळेत याचं गणीत अवलंबून आहे. सध्या तीनही पक्ष विजयाचा दावा करत आहेत. मात्र मतदारराजाच्या मनात नेमकं काय आहे याचा फैसला ऐकण्यासाठी 31 तारखेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

COMMENTS