पालघर – खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक, जिल्हाधिका-यांचे चौकशीचे आदेश !

पालघर – खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक, जिल्हाधिका-यांचे चौकशीचे आदेश !

पालघर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. या मतदानादरम्यान अनेक मशीन बंद पडल्या होत्या. त्यानंतर आज धक्कादायक माहिती समोर येत असून एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील या मतपेट्या होत्या. किराट गावातील काही दक्ष नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला असून याबाबत चौकशी कऱण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.

दरम्यान पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मतपेट्या वाहून नेण्यासाठी सरकारी वाहने आणि चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं, निवडणूकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र या धक्कादायक माहितीमुळे खळबळ उडाली आहे. बूथ क्र.17 चिंचरेमधील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार किराट येथील नागरिकांनी समोर आणला. या मतपेट्या खासगी वाहन क्रमांक एम एच 03 ,बीएस 0980 मधून नेल्या जात होत्या. आधीच मतदानावेळी अनेक ईव्हीएम बंद पडल्याने, निवडणूक प्रक्रियेवरच विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यातच ही घटना घडल्यामुळे या मतदानाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

COMMENTS