श्रीनिवास वनगांबाबत शिवसेनेचं ‘वेट अँड वॉच’ !

श्रीनिवास वनगांबाबत शिवसेनेचं ‘वेट अँड वॉच’ !

पालघर  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेनं दिवंगत चिंतामण वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती मिळाली होती. परंतु श्रीनिवास वनगा यांच्याबाबत शिवसेना अद्यापही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहे. कारण ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतरही श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी द्यायची की नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात बैठकांवर बैठक सुरु असून शिवसेनेने अजूनही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली जाणार का नाही याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान या पोटनिवडणुकीबाबत सकाळपासून ‘मातोश्री’वर खलबतं सुरु असल्याचं दिसून आलं आहे. प्रत्येक पदाधिकारी, आमदार आणि खासदाराला पोटनिवडणुकीची विभागवार जबाबदारी देण्यात आली होती. परंतु या बैठकीनंतरही शिवसेनेने उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केली नाही.

दरम्यान पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. त्यानंतर चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. परंतु शिवसेनेच्या वरिष्ठांनी मात्र श्रीनिवास वनगा यांच्याबाबत ‘वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS