मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांचं कौतुक केलं आहे. एकमेकांवर नेहमीच टीका करणा-या या बहिण-भावंडानं एकमेकांचं चक्क कौतुक केल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना या दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना, अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषण कमी झालं आहे. त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
त्यावर पंकजांनीही कुपोषण कमी झाल्याची कबुली दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे आभार मानले. ”कुपोषण वाढलं असल्याचं सांगत नेहमी टीका होते. मात्र कधी नव्हे ते माझ्या खात्याचं या सभागृहात कौतुक केल्याबद्दल आभार मानते,” असं पंकजा मुंडे यांनी त्यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान पंकजा मुंडेंनी आभार मानल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही यावर लगेच उत्तर दिलं. ”मन मोठं करुन माझे आभार मानले तसंच अंगणवाडी सेविकांचं मानधनही 10 हजार रुपये करावं,” अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यावेळी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन दाबण्यासाठी त्यांच्यावर मेस्मा लावण्यात येत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मात्र मेस्मा लावण्याचा निर्णय हा अन्यायकारक नाही. कुपोषित बाळाला दोन ते तीन दिवस पोषण आहार भेटला नाही, तर मृत्यूचं संकट ओढावतं. त्यामुळे या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. दरम्यान नेहमीच एकमेकांवर टीकेचा वर्षाव करणा-या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आज चक्क एकमेकांचं कौतुक केल्यामुळे सभागृहातलं चित्रच बदललं असल्याचं पहावयास मिळालं.
COMMENTS