पंकजा मुंडेंनी 106 कोटींचा घोटाळा केला, धनंजय मुंडेंचा आरोप!

पंकजा मुंडेंनी 106 कोटींचा घोटाळा केला, धनंजय मुंडेंचा आरोप!

मुंबई – महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणा-या मोबाईल खरेदीत सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोबाईलची खरेदी तत्काळ थांबवून चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान महिला व बाल कल्याण विभागाने राज्यातील ३० जिल्ह्यातील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रासाठी सुमारे लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पॅनासोनिक इलुगा १७ हा मोबाईल खरेदी केला जाणार आहे. संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग (आयसीटी-आरटीएम) योजनेसाठी हे मोबाईल खरेदी करण्यात आले आहेत. परंतु या मोबाईल कंपनीला जास्तीची रक्कम देण्यात आली असून पॅनासोनिक इलुगा १७ या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत ६ हजार ४९९ रूपये इतकी आहे.

तर, हा मोबाईल ६००० ते ६४०० रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलसाठी ८ हजार ७७७ रूपये इतकी किंमत लावली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सरासरी २२०० रूपये इतकी वाढविण्यात आली असून महिला व बाल कल्याण विभागाने बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून आणखी ५ हजार १०० मोबाईल अतिरिक्त खरेदी केले आहेत. त्यामुळे जास्तीची रक्कम लावून या विभागाने मोबाईल खरेदीत सुमारे १०६ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

तसेच हाच मोबाईल जर ६ हजार ४९९ रूपयांत बाजारात उपलब्ध असेल तर या विभागाने अधिकचे २२०० रूपये का मोजले? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि याची चौकशी करणे गरजेचे असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. याबाबतची बातमी डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

COMMENTS