बीड – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज अखेर थंडावल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा मतदान आणि निकालाकडे लागल्या आहेत. 21 ऑक्टोंबरला मतदान होणार आहे तर 24 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी जास्तीतजास्त मतदारांपुढे पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. परळी मतदारसंघातील भाजपच्या
उमेदवार पंकजा मुंडे या देखील गेली काही दिवसांपासून जोरदार प्रचार करत आहेत.
आजही त्यांनी मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जाऊन प्रचार केला. पंकजा मुंडे यांची परळीमध्ये शेवटची सभा पार पडली. परंतु या सभेत भाषण केल्यानंतर स्टेजवरच त्यांना चक्कर आली. चक्कर आल्यामुळे त्या स्टेजवरच कोसळल्या. यावेळी त्यांचे पती अमित पालवे त्यांच्यासोबतच होते. चक्कर आल्यानंतर पालवे यांनी पंकजा यांना दवाखान्यात नेले. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना डिश्चार्ज दिला आहे.
दरम्यान यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरही उपस्थित होते. पंकजाताई गेल्या काही दिवसांपासून प्रचारात इतक्या व्यस्त आहेत की, त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. सततचा प्रवास आणि जागरणामुळे त्यांना अॅसिडिटीचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांना चक्कर आली असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS