बीड – महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादावर पडदा पडला असल्याचं दिसून येत आहे. कारण पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री हे बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तागडगाव येथे नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका व्यासपीठावर आले असल्याचं पहावयास मिळालं आहे. यावेळी नामदेव शास्त्रींचं दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी भाषण केलं. मोठ्या मनाने महंत नामदेव शास्त्रींना मनापासून वंदन करत असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे या दोघांमधील वादावर आता पडदा पडला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वेळी राजकीय भाषणावरुन महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादावर आता पडदा पडला असल्याचं दिसत आहे. यावेळी बोलत असताना संत भगवानबाबांनी आपल्याला वैभवशाली परंपरा दिली असून समाज एकसंघ रहायला पाहिजे, शिवाय हे सप्ताहाचं व्यासपीठ असून आपण इथे राजकीय भाषण करणार नाही, असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच धर्माचं क्षेत्र हे धार्मिक कार्यक्रमांसाठीच असायला हवं, असं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणायचे. तेच सूत्र मी देखील पाळणार असून राजकारण करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS