पेरणी नसली तरी सरकार देणार दुष्काळग्रस्त शेतक-यांना विम्याचे संरक्षण – पंकजा मुंडे

पेरणी नसली तरी सरकार देणार दुष्काळग्रस्त शेतक-यांना विम्याचे संरक्षण – पंकजा मुंडे

परळी – अफवा पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करणे हेच एकमेव काम एकीकडे विरोधक करीत असताना  आमचं स्वप्न मात्र सर्वदूर आणि सर्वंकष विकासाचे आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम मला करायचे आहे असे सांगून दुष्काळाची दाहकता लक्षात घेता सरकार पेरणी न करणा-या शेतक-यालाही विम्याचा लाभ मिळवून देणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

तालुक्यातील पौळ पिंपरी, कौडगांव साबळा येथे पंकजा मुंडे यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ, लोकार्पण तसेच जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. बीड येथील मुख्यमंत्र्यां समवेतची दुष्काळी आढावा बैठक संपल्यानंतर लगेचच त्यांनी संपर्क दौ-यास सुरवात केली. सायंकाळी 6 च्या सुमारास सुरू झालेल्या सभेस महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक कोटी ५२ लाख रूपयांच्या पिंपरी पाटी ते कृष्णानगर तांडा, सांस्कृतिक सभागृह, गावातील मुख्य चौक ते हनुमान मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता आदी कामांचा त्यांनी  श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पिंपरी हे गाव नेहमी विकासाच्या बाबतीत पुढे आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मी सर्वप्रथम या गावात सभा घेतली होती. स्व.मुंडे साहेबांनी मला या गावाबद्दल खूप काही सांगितले होते. मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला फारसे यश मिळाले नाही. परंतु तसे असतांनाही विकास कामांचा झपाटा चालूच आहे. दरवर्षी या वंचित आणि पीडित गावांना आपण शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहोत. २५१५ अंतर्गत गाव रस्ते, स्मशानभूमीत शेडसाठी निधी ग्रामविकास खात्याच्या मार्फत लाखो रुपयांचा निधी दिला आहे आणि देत आहोत. आमदार फंड, खासदार फंडासह जलयुक्त शिवार योजनेचा लक्षावधी रुपये गावाला दिले आहेत. पिंपरी आणि परिसरातील गावांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेतलं असल्याने गावे स्वछ आणि सुंदर दिसू लागली आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पीकविमा, बोंडआळींचे अनुदान मिळवून देण्यात यश आले आहे. तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळू शकल्याने त्यांना लाखो रुपयांचे उत्पादन होत आहे. बीड जिल्ह्यातील शाळा दुरुस्त करण्यासाठी नुकताच २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. फक्त मतदारसंघात नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात विकासाची नांदी आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे. चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य आणि सर्वच गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या आहेत. विकास कामाच्या बाबतीत आपले सरकार नेहमी पुढे आहे. मतदारसंघात झालेले रस्ते हे अतिशय दर्जेदार आणि पोटातील पाणी हलणार नाही असे झाले आहेत. यापुढेही कोणत्याही गावातील कोणताही रस्ता कामाचा शिल्लक राहणार नाही. निसर्गाने जरी तुमच्यावर पाठ फिरवली तरी मी आणि माझे सरकार असे करणार नाही. वैद्यनाथ कारखाना सुरू होईल, प्रत्येकाचा ऊस जाईल आणि प्रत्येकाचे पैसे मिळतील.

 

राष्ट्रवादीचे यशवंत कराड भाजपात

 कौडगांव साबळा येथे २५१५ व इतर योजनेतून पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण  पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यशवंत कराड,  किशनराव पाटील यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.  पंकजा मुंडे यांनी त्यांचे याप्रसंगी स्वागत केले. कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नामदेवराव आघाव, जीवराज ढाकणे, व्यंकटराव कराड, रमेश कराड, वृक्षराज निर्मळ, सतीश मुंडे, सुरेश माने, रामेश्वर मुंडे, आश्रुबा काळे, प. स. सदस्य मोहन आचार्य, सुधाकर पौळ, भीमराव मुंडे, माऊली साबळे,  राजेश गिते, रवि कांदे, रामभाऊ कोपनर, बिभीषण फड, लक्ष्मीकांत कराड, संतोष धानोरकर, रमेश पौळ आदींसह असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS