उस्मानाबाद – अशा लोकप्रतिनिधींना आम्ही पाडायलाही मागे पाहणार नाही, शिवसेना नेते अनंत तरेंचा इशारा !

उस्मानाबाद – अशा लोकप्रतिनिधींना आम्ही पाडायलाही मागे पाहणार नाही, शिवसेना नेते अनंत तरेंचा इशारा !

उस्मानाबाद – कोळी समाजाचे प्रश्न सोडविले जावेत, यासाठी आम्ही अनेक लोकप्रतिनिधींना निवडूण देतोत. पण, समाजाचे प्रश्न सोडविण्यात आडकाठी येत असेल, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशा लोकप्रतिनिधींना आम्ही पाडायलाही मागे पाहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते तथा राज्य कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला आहे. महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते उमरगा येथे बोलत होते. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे आदी यावेळी उपस्थित होते. उमरगा येथे पंचायत समितीच्या मैदानावर महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तरे म्हणाले की, जात वैधता प्रमाणपत्राच्या फेरचौकशीत समाजाला गुंतवून ठेवले जात आहे. जाणीवपूर्वक असा प्रकार केला जात आहे. त्यासाठी कोळी समाज आपली ताकद दाखवू शकतो. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी जसे आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देवू शकतो, तसे निवडणुकीत पाडूही शकतो, हे सत्ताधार्‍यांनी लक्षात घ्यावे, असा इशाराच तरे यांनी दिला आहे. उमरगा येथे रविवार, 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पंचायत समितीच्या मैदानावर कोळी समाजाच्यावतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कोळी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. खासदार रवींद्र गायकवाड, उमरगा, लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, युवा उद्योजक देवदत्त मोरे, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिवमदन भोई, मराठवाडा प्रमुख सिध्देश्वर कोळी, नगरसेवक पंढरीनाथ कोणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी आयोजकांच्यावतीने मान्यवरांचा कोळीभूषण टोपी घालून सत्कार करण्यात आला.

उमरगा ते गुंजोटी रस्त्यातील चौकास महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले. उपनेते अनंत तरे, आमदार चौगुले व उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. याच कार्यक्रमात खासदार रवींद्र गायकवाड यांनी कोळी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात लोकसभेत आवाज उठवू, असे आश्वासन देत आम्ही कोळी समाजाच्या प्रश्नसाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असे सांगितले. आमदार चौगुले यांनी समाजाचे विविध प्रश्न वारंवार आपण अधिवेशनात मांडतो. जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सोबत आहोत आणि राहणार असा विश्वास व्यक्त केला. उद्योजक देवदत्त मोरे यांनी समाजाच्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपण मदत करीत असून समाजातील युवकांनी शिक्षण, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे होवून समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असे सांगितले.

यावेळी गायक संतोष चौधरी यांचा दादूस आला रे कोळी व लोकगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कोळी गीताने उमरगाकरांची मने जिंकली. कार्यक्रमास भारती कोळी, सुधावडे, गणेश कोळी, संजीव कोळी, दिगंबर जमादार, विक्रम घाटे, किशोर घाटे, व्यंकट घाटे, हनुमंत पालमपल्ले, सत्यवान भालेराव, प्रभाकर घाटे, तानाजी घाटे, जीवन एकबे, नीलकंठ घाटे, राणेश घाटे, योगेश घाटे, नितीन जमादार, राजेंद्र घाटे, नेताजी घाटे, विकास घाटे, ज्ञानेश्वर पालमपल्ले, राम माने, एस. एन. माने, भोसले, मुजीब इनामदार, असीम कोतवाल यांच्यासह कोळी समाज संघाचे अन्य पदाधिकारी, हजारो कोळी बांधव उपस्थित होते.

COMMENTS