महिला दिनानिमित्त राज्य शासनाची भेट, राज्यात सुरु होणार अस्मिता योजना !

महिला दिनानिमित्त राज्य शासनाची भेट, राज्यात सुरु होणार अस्मिता योजना !

मुंबई – ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणाऱ्या अस्मिता योजनेचा शुभारंभ उद्या जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील मुलींना फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीन मिळणार आहेत. उद्या दुपारी ०१.३० वाजता मुंबई विद्यापीठातील कॉन्व्हकेशन हॉल येथे होणाऱ्या या समारंभात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर हेही उपस्थित राहणार आहेत.

स्वच्छतेबरोबर महिलांना रोजगारही मिळणार – मंत्री पंकजा मुंडे

अस्मिता योजनेसंदर्भात माहिती देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, एका सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकीनचा उपयोग केवळ १७ टक्के मुली, महिला करतात. बाजारातील सॅनिटरी नॅपकीनची न परवडणारी किंमत, सहज उपलब्धता नसणे तसेच लोकलज्जेस्तव दुकानदाराकडे सॅनिटरी नॅपकीन मागण्यासाठी जाण्याचा संकोच या कारणांमुळे आजही मुली, महिला पारंपारिक सवयींचा अवलंब करतात. या संवेदनशील बाबीचा विचार करुन ग्रामीण भागातील मुली व महिलांच्या आरोग्य, शिक्षण व रोजगाराचे चित्र बदलण्यासाठी ग्रामविकास विभागाने अस्मिता योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मान्यवरांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे.

त्या म्हणाल्या की,  या योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना ५ रुपये माफक दराने आणि ग्रामीण भागातील महिलांना २४ रुपये व २९ रुपये या सवलतीच्या किंमतीत उत्कृष्ट दर्जाचे सॅनिटरी नॅपकीन (८ पॅडचे एक पाकीट) पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी लाभार्थी मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहेत. उमेद अभियानांतर्गत सहभागी असलेल्या महिला बचतगटांमार्फत सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा, विक्री आणि समुपदेशनाचे काम करण्यात येणार आहे. बचतगटातील महिलांना प्रति पाकीट ५ रुपयांचा नफा शासनाने निश्चित करुन दिला आहे. यामुळे बचतगटातील महिलांना रोजगारही मिळणार आहे, असे त्यांनी सागंतिले.

COMMENTS