वाघांनो रडू नका, पंकजा मुंडेंचं  कार्यकर्त्यांना भावनिक ट्वीट !

वाघांनो रडू नका, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावनिक ट्वीट !

मुंबई – विधान परिषदेसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे. पक्षातील ज्येष्ठ आणि इच्छुक नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक ट्वीट केलं आहे. आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असे रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद असं ट्वीट मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे. रिक्त झालेल्या 9 जागांपैकी भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येणार असल्याचं दिसत आहे. राज्यातील पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 54, काँग्रेसकडे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1,स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज असल्यामुळे या निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे.

COMMENTS